Dr Babasaheb Ambedkar | डॉ. बाबासाहेब आंबेडकर माहिती - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, July 6, 2023

Dr Babasaheb Ambedkar | डॉ. बाबासाहेब आंबेडकर माहिती

Dr Babasaheb Ambedkar

डॉ. बाबासाहेब आंबेडकर माहिती

Dr Babasaheb Ambedkar | डॉ. बाबासाहेब आंबेडकर माहिती | B R Ambedkar


"ज्ञान हे अथांग सागरासारखे आहे. माणसाने आयुष्यभर शिकायचे म्हटले आणि त्याप्रमाणे शिक्षण घेतले तर आयुष्याच्या शेवटी त्याच्या लक्षात येईल की या ज्ञानसागरामध्ये केवळ गुढगाभर पाण्यात पोहचू शकेल एवढेच ज्ञान आपल्याला प्राप्त झाले आहे."

            तुम्हाला माहित आहे का? शिक्षणाविषयीचे हे मत कोणाचे आहे. हो तुमच्या डोळ्यासमोर अगदी बरोबर चित्र उभे राहिले आहे. ते आहेत महामानव, भारतीय राज्यघटनचे शिल्पकार, महान कायदेपंडीत, पत्रकार, लेखक, समाजशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, तत्त्वज्ञानी, पाली, बौध्द, संस्कृत, हिंदी साहित्याचे अभ्यासक, राजनीती तज्ञ, विज्ञानवादी, समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्यायाचे पुरस्करते, शेतकरी, कामगारांचे, मानवी हक्कांचे व शोषितांचे कैवारी व अशा अनेक पदव्या प्राप्त असलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ( Dr Babasaheb Ambedkar ).डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म :-

            डॉ. बाबासाहेब आंबेडकर ( Dr Babasaheb Ambedkar ) यांचा जन्म मध्यप्रदेशात इंदूरजवळ महू या गावी १४ एप्रिल १८९१ साली झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी मालोजी सकपाळ व आईचे नाव भीमाबाई होते. त्यांच्या आईच्या नावावरूनच त्यांचे नाव भिवा असे ठेवण्यात आले पुढे त्याच्यावरूनच भीमा व नंतर भिमराव असे नाव रूढ झाले. त्यांचे मुळगांव रत्नागिरी जिल्हयातील अंबवडे होते. त्यांचे वडिल इंदौर येथे इंडियन आर्मीत सुभेदार होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राथमिक शिक्षण व नावात बदल :-

            इ.स. १८९४ ला त्यांचे वडिल निवृत्त झाले आणि संपुर्ण कुटूंब महाराष्ट्रातील साताऱ्यात स्थलांतरीत झाले. साताऱ्यातील कॅम्प स्कूलमधील मराठी शिक्षण पूर्ण केल्यानंतर साताऱ्यातीलच सातारा हायस्कूल या इंग्रजी सरकारी हायस्कूलमध्ये भिमरावाचे नाव दाखल केले. कोकणासह महाराष्ट्रातील लोक पूर्वी आपले आडनाव आपल्या गावाच्या नावावरून ठेवत असत व त्यात शेवटी कर शब्द जोडण्याचा प्रघात होता. त्यामुळेच बाबासाहेबांचे आडनाव "सकपाळ" असतांना त्यांच्या वडीलानी ७ नोव्हेंबर १९०० रोजी "आंबडवेकर" असे आडनाव नोंदवले. साताऱ्याच्या या शाळेत भीमरावांना शिकवण्यासाठी कृष्णा केशव आंबेडकर नावाचे शिक्षक होते. शाळेच्या दप्तरात नोंदवलेले भीमरावांचे आंबडवेकर हे आडनाव उच्चारताना त्यांना ते आडनिडे वाटत असे म्हणून माझे आंबेडकर हे नाव तू धारण कर, त्यांनी असे भीमरावांना सुचविले. त्यावर भीमरावांनी होकार दिल्यावर तशी नोंद शाळेत झाली. तेव्हापासून त्यांचे आडनाव आंबडवेकरचे 'आंबेडकर' असे झाले.


            नोव्हेंबर १९०४ मध्ये भीमरावांनी इंग्रजी चौथीची परीक्षा उत्तीर्ण केली व यावर्षीच संपूर्ण परिवार मुंबईला आले. मुंबईमधे आल्यावर भीमराव हे एल्फिन्स्टन रस्त्यावरील सरकारी शाळेत जाऊ लागले, इतर जातीतील लोकांच्या विरोधामुळे रामजींनी मुलांना सरकारी शाळेत शिकवण्यासाठी आपल्या लष्करातील पदाचा वापर केला. शाळेत प्रवेश मिळाला तरी भीमरावांना वर्गात बसण्याची परवानगी नव्हती, इतर विद्यार्थ्यांपासून त्यांना वेगळे बसावे लागे आणि शिक्षकांचे सहाय्य मिळत नसे. स्पृश्य-अस्पृश्यतेचे चटके प्राथमिक शिक्षणापासूनच त्यांनी सोसले. परंतु ते त्याने खचून न जाता त्यांनी अस्पृश्य दीन दलितांचा उद्धार करायचे हेच जीवनाचे अंतिम ध्येय ठेवले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विवाह, पुत्रप्राप्ती व पितृशोक :-

            शाळेत असतानाच इ.स. १९०६ मध्ये वयाच्या १४ - १५ व्या वर्षी त्यांचे लग्न दापोलीच्या भिकू वलंगकर यांची कन्या रमाबाई यांच्याशी झाले. विवाह झाल्यानंतर सात वर्षांनी १२ जानेवारी १९१२ रोजी त्यांना मुलगा झाला. त्याचे नाव यशवंत ठेवण्यात आले. परंतु या आनंदाबरोबरच एक दुखः जणू काही त्यांची वाटच पाहत होते ते म्हणजे एक वर्षानंतर २ फेब्रुवारी, इ.स. १९१३ रोजी मुंबईमध्ये त्यांच्या वडिलांचे आजाराने निधन झाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे माध्यमिक शिक्षण :-

            डॉ. बाबासाहेब आंबेडकर ( Dr Babasaheb Ambedkar ) हे आपल्या विद्यार्थी जीवनात दररोज १८ तास अभ्यास करत असत. त्यांनी इ.स. १९०७ साली एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये मॅट्रिकची परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाले. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर कृष्णाजी अर्जुन केळुसकर गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली सभा भरवून भिवा रामजी आंबेडकरांचे कौतुक केले. यावेळी केळुसकर गुरुजींनी स्वतः लिहिलेल्या मराठी बुद्धचरित्राची एक प्रत भीमरावांना भेट म्हणून दिली. हे पुस्तक वाचल्यानंतर त्यांना पहिल्यांदाच बुद्धांच्या शिकवणुकींची माहिती मिळाली व ते बुद्धाप्रती आकर्षित झाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महाविद्यालयीन शिक्षण :-

            डॉ. बाबासाहेब आंबेडकर ( Dr Babasaheb Ambedkar ) यांचे वडील त्यांना आर्थिक अडचणीमुळे महाविद्यालयीन शिक्षण देऊ शकतील, अशी परिस्थिती तेव्हा त्यांची नव्हती. त्यामुळे केळुसकर गुरुजींनी मुंबईमध्ये महाराज सयाजीराव गायकवाड यांच्याशी भीमरावांची भेट घालून दिली. भीमरावांची हुशारी पाहून महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी महाराजांनी त्यांना शिष्यवृत्ती देण्याचे मंजूर केले. त्यानंतर ३ जानेवारी, इ.स. १९०८ रोजी भीमरावांनी एल्फिन्स्टन महाविद्यालयात प्रवेश घेतला. पुढे चार वर्षांनी इ.स. १९१२ मध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठाची राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र विषय घेऊन बी.ए.ची पदवी संपादन केली.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे उच्च शिक्षण :-

कोलंबिया विद्यापीठात

            बडोदा नरेशांकडून प्रति महिने साडे अकरा पाऊंड शिष्यवृत्ती घेऊन ते अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात उच्च शिक्षण घेण्यासाठी गेले.

लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स आणि ग्रेज-इन

            डॉ. बाबासाहेब आंबेडकर ( Dr Babasaheb Ambedkar ) यांनी इ.स. १९१६ च्या ऑक्टोबर महिन्यात अर्थशास्त्रामध्ये पदव्या घेण्याच्या हेतूने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्समध्ये प्रवेश घेतला. कोलंबिया विद्यापीठात एम.ए. व पीएच.डी. या पदव्यांसाठी आंबेडकरांनी अर्थशास्त्राचा अभ्यास केला होता, त्यामुळे बी.एस्सी.ची परीक्षा न देता थेट एम.एस्सी. साठी प्रवेश मिळावा, अशी प्रा. कॅनन यांच्या शिफारशीसह असलेली विनंती लंडन विद्यापीठाने मान्य केली.

            बॅरिस्टर होण्यासाठी ११ नोव्हेंबर १९१६ रोजी लंडनमधील ग्रेज इन मध्ये प्रवेश घेतला. हा अभ्यास सुरू असतानाच एम.एस्सी. पदवी मिळवण्याकरिता प्रॉव्हिन्शियल डीसेंट्रलायझेशन ऑफ इम्पिरियल फायनान्स (भारतीय शाही अर्थव्यवस्थेचे प्रांतीय विकेंद्रीकरण) विषयावर प्रबंध लिहिणे सुरू केले. परंतु त्यांच्या एक वर्ष शिष्यवृत्तीची कालमर्यादा संपल्यामुळे अभ्यास अर्धवट सोडून त्यांना भारतात परतावे लागले. लंडन सोडण्यापूर्वी आंबेडकरांनी पुढील चार वर्षांच्या कालमर्यादेत म्हणजे ऑक्टोबर १९१७ ते सप्टेंबर १९२१ पर्यंत कोणत्याही वेळी लंडन येऊन आपला अपूर्ण राहिलेला अभ्यास पूर्ण करण्यासाठी पुन्हा प्रवेश घ्यावा, अशी लंडन विद्यापीठाकडून परवानगी मिळवली होती.            डॉ. बाबासाहेब आंबेडकर ( Dr Babasaheb Ambedkar ) यांनी ३० सप्टेंबर १९२० रोजी लंडन स्कूल इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स आणि ग्रेज-इन मध्ये पुन्हा प्रवेश घेतला. ते सकाळी सहा वाजता ग्रंथालयात जात, ग्रंथालयात सर्वप्रथम त्यांचाच प्रवेश होई. दिवसभर पुरेल इतके साहित्य घेउन ते एकाबैठकी अखंड अभ्यास करीत. दुपारच्या वेळी खाण्यासाठीच ते जागेवरून थोडा वेळ आपल्या जागेवरून उठत असत. ग्रंथालय सायंकाळी बंद होत असताना ते सर्वात शेवटी बाहेर पडत असत. राहण्याच्या ठिकाणीही ते जेवणानंतर रात्री मध्यरात्रीपर्यंत अभ्यास करत असत. खाणे, आराम करणे, झोप घेणे किंवा मनोरंजनासाठी वेळे देणे; हे सर्व त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे नसून सतत अभ्यास करणे, हे त्यांचे ध्येय होते.

            वर्षभरात आंबेडकरांनी त्यांचा शोधप्रबंध प्रॉव्हिन्शियल डीसेंट्रलायझेशन ऑफ इम्पिरियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया (ब्रिटिश भारतातील साम्राजीय अर्थव्यवस्थेचे प्रांतीय विकेंद्रीकरण) तयार केला आणि जून १९२१ मध्ये एम.एस्सी.च्या पदवीसाठी लंडन विद्यापीठात सादर केला. विद्यापीठाने प्रंबंध स्वीकारून २० जून १९२१ रोजी त्यांना अर्थशास्त्रातील एम.एस्सी. ही पदवी प्रदान केली. २८ जून १९२२ रोजी ग्रेज-इन संस्थेने त्यांना बॅरिस्टर-ॲट-लॉ (बार-ॲट-लॉ) ही कायद्याची उच्चतम पदवी प्रदान केली. त्यानंतर 'द प्रोब्लम ऑफ रुपी' (रुपयाचा प्रश्न) हा अर्थशास्त्रीय प्रबंध तयार करून 'डॉक्टर ऑफ सायन्स' (डी.एस्सी.) च्या पदवीसाठी ऑक्टोबर १९२२ मध्ये लंडन विद्यापीठात सादर केला.

जर्मनीचे बॉन विद्यापीठ

            अर्थशास्त्रावर संशोधनात्मक लेखन करून जर्मनीच्या बॉन विद्यापीठाचीही डॉक्टरेट पदवी मिळवावी हा विचार करून ते जर्मनीला गेले आणि बॉन विद्यापीठामध्ये प्रवेश घेतला. ते जर्मन भाषाही शिकलेले होते. तेथे तीन महिने राहून त्यांनी प्रबंधलेखनाची तयारी केली. त्याचवेळी शिक्षक एडविन कॅनन यांनी डी.एस्सी. पदवी संदर्भात लंडनला येण्यासंबंधीचे पत्र त्यांना पाठवल्यामुळे ते लगेच लंडनला परतले. प्रबंधात आंबेडकरांनी भारतातील ब्रिटिश साम्राज्याच्या धोरणांवर टीका केलेली असल्यामुळे मार्च १९२३ मध्ये परीक्षकांनी स्वतःच्या प्रबंधाचे त्यांच्या धोरणानुसार पुनर्लेखन करण्याचे सांगितले. यासाठी तीन-चार महिन्यांचा कालावधी लागणार होता. यादरम्यान त्यांच्याजवळील पैसे संपत चालले होते म्हणून त्यांनी भारतात जाऊन तेथे प्रबंध पूर्ण करण्याचे ठरवले. त्यांनी बॉन विद्यापीठाचा प्रबंध सोडून दिला. आंबेडकर लंडनहून बोटीने भारताकडे निघाले व ३ एप्रिल १९२३ रोजी ते मुंबईला पोहोचले.


            डॉ. बाबासाहेब आंबेडकर ( Dr Babasaheb Ambedkar ) यांनी ऑगस्ट १९२३ मध्ये आपले निष्कर्ष न बदलता लिखाणाची पद्धत बदलून प्रबंध लंडन विद्यापीठाला पुन्हा एकदा पाठवला. विद्यापीठाने तो प्रबंध मान्य करत नोव्हेंबर १९२३ मध्ये त्यांना डी.एस्सी.ची पदवी प्रदान केली. लंडनच्या 'पी.एस. किंग अँड कंपनी प्रकाशन' संस्थेने 'द प्रोब्लेम ऑफ रुपी' हा प्रबंध इ.स. १९२३ च्या डिसेंबर मध्ये ग्रंथरूपाने प्रसिद्ध केला. या ग्रंथाला त्यांचे मार्गदर्शक अर्थशास्त्रज्ञ डॉ. कॅनन यांनी प्रस्तावना लिहिली होती. हा प्रबंध आंबेडकरांनी आपल्या आई-वडिलांस अर्पण केला होता. या संशोधनांमुळे तसेच ग्रंथलेखनामुळे अर्थशास्त्र व राज्यशास्त्र ज्ञानशाखांतील तज्ज्ञ व्यक्ती तसेच निष्णात कायदेपंडित म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर ओळखले जाऊ लागले. इंग्लंडमध्ये शिकत असताना ज्या अभ्यासक्रमाला ८ वर्षे लागतात तो आंबेडकरांनी २ वर्षे ३ महिन्यांत यशस्वी तऱ्हेने पूर्ण केला होता. यासाठी त्यांना दररोज २४ तासांपैकी २१ तास अभ्यास करावा लागला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य :-

            डॉ. बाबासाहेब आंबेडकर ( Dr Babasaheb Ambedkar ) यांच कार्य इतक महान, मोठे व विस्तारित आहे की ते मला या लेखात मांडणे अश्यक आहे परंतु त्याचे थोडेसे कार्य मी येथे मांडण्याचा प्रयत्न करतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षण घेऊन परतल्या नंतर त्यांनी आपल्या बांधवाना ‘शिका, संघटीत व्हा व संघर्ष करा’ हा संदेश दिला. गोरगरीब दलित समाज्याच्या न्याय व हक्कासाठी लढले. डॉ.बाबासाहेब आंबडेकर यांनी समाजातील भेदभाव, उच्चनीच यांचे समर्थन करणाऱ्या मनुस्मृती ग्रंथाचे जाहीररीत्या दहन केले. तसेच नाशिक येथील काळाराम मंदिरामध्ये दलितांना प्रवेश मिळावा म्हणून सत्याग्रह केला. महाडच्या चवदार तळ्यावर दीन दलितांना पाणी भरण्याचा हक्क मिळवून दिला.

            साऊथबरो मताधिकार समितीसमोर साक्ष दिली, समाज समता संघ नावाच्या संस्थेची स्थापना केली, अस्पृश्यांच्या परिषदांमधील, बहिष्कृत हितकारिणी सभा, अंबादेवी मंदिर सत्याग्रह, पर्वती मंदिर सत्याग्रह यांमध्ये सहभाग घेतला, शेतकऱ्यांच्या मोर्चात सहभाग व खोती पद्धतीवर बंदी केली, गोलमेज परिषदांमधील सहभाग, पुणे करार करून दलितांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले, धर्मांतराची घोषणा केली, 'हरिजन' शब्दाला विरोध केला, तसेच मूकनायक या पाक्षिकातून अस्पृश्यांच्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम केले. बहिष्कृत भारत हे साप्ताहिक व समता हे वृत्तपत्र सुरु करून यातून त्यांनी गरीब जनता व दलित समाजास न्याय व हक्क मिळवून दिला. भारत स्वतंत्र झाल्यावर संविधान तयार करण्याचे महत्त्वाचे कार्य केले त्यामुळे त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणतात.


             आम्ही तुम्हाला येथे Dr Babasaheb Ambedkar | डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी माहिती देण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. तरी यात काही नकळत चुकीची माहिती आल्यास सुचवावी ती तपासून आम्ही दुरुस्त करू. तुम्हाला Dr Babasaheb Ambedkar | डॉ. बाबासाहेब आंबेडकर माहिती आवडली असेल तर शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad