मराठी प्रार्थना | Prayer in Marathi | Prarthana in Marathi | Marathi Prarthana Lyrics - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, July 1, 2023

मराठी प्रार्थना | Prayer in Marathi | Prarthana in Marathi | Marathi Prarthana Lyrics

मराठी प्रार्थना

Prayer in Marathi | Marathi Prarthana Lyrics

            मराठी प्रार्थना ( Prayer in Marathi | Prarthana in Marathi | Marathi Prarthana Lyrics ) या विषयावर आज हा लेख आहे. मराठी प्रार्थना शाळेत ( Marathi Prarthana for school ) जास्त उपयोगात येतात. तेथे पण विद्यार्थ्यांना पाठ करण्यासाठी त्या लिखित स्वरुपात मराठी प्रार्थना (Marathi Prarthana written / Marathi Prarthana lyrics )  मोठ्या प्रमाणावर लागतात त्यासाठी Marathi Prarthana pdf मोठ्या प्रमाणावर शोधल्या जातात. तसेच ऐकवण्यासाठी व चालीसाठी  Marathi Prarthana song तसेच Marathi Prarthana poem स्वरुपात पण शोधल्या जातात. आम्ही तुम्हाला चांगल्या मराठी प्रार्थनांची यादी ( Marathi Prarthana list ) उपलब्ध करून दिली आहे.

मराठी प्रार्थना | Prayer in Marathi | Prarthana in Marathi | Marathi Prarthana Lyrics

            प्रार्थना एक विनंती आहे जी जाणीवपूर्वक संप्रेषणाद्वारे उपासना करण्याच्या उद्देशाने केली जाते. प्रार्थना हा शब्द एखाद्या देव किंवा एखाद्या पूर्वजांकडे भूतकाळात झालेल्या चुकांची माफी मागणे, वर्तमानातील अडचणी, दुःख दूर करून चांगल्या भविष्यासाठी केलेली विनवणी किंवा मध्यस्थीच्या क्रियेस सूचित करतो. सामान्यत: प्रार्थनेतही धन्यवाद किंवा स्तुती करण्याचा हेतू असू शकतो.


            प्रार्थना वेगवेगळ्या प्रकारची असू शकते: ती एखाद्या सेट लिटर्जी किंवा विधीचा भाग असू शकते आणि ती एकट्याने किंवा गटात केली जाऊ शकते. प्रार्थनेत एखाद्या स्तोत्र, जादू, औपचारिक विवाहाचे विधान किंवा एखादी उत्स्फूर्त उच्चार असू शकते.

            चला तर मग पाहूया मराठी प्रार्थना | Prayer in Marathi | Prarthana in Marathi | Marathi Prarthana Lyrics याविषयी माहिती.

मराठी प्रार्थनांची यादी

Marathi Prarthana list


अ.क्रमराठी प्रार्थना
०१खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे
०२असो तुला देवा ! माझा सदा नमस्कार
०३देह मंदिर, चित्तमंदिर, एक तेथे प्रार्थना
०४सर्वात्मका, शिवसुंदरा स्वीकार या अभिवादना
०५अनंता तुला कोण पाहू शके ?
०६दिवा पाहुनी लक्ष्मी येते करू तिची प्रार्थना
०७तू बुद्धि दे, तू प्रकाश दे, नवचेतना विश्वास दे
०८नमने वाहुनि स्तवने उधळा, जयजयकार करा बंधुहो, 
०९मार्ग लाभो पावलांना ही तृणाची याचना
१०हे करुणाकरा, ईश्वरा । कृपादान मज देई
११तू अनश्वरातील अमरेश्वर अविनाशी
१२शुद्धी दे, बुद्धी दे, हे दयाघना
१३जय शारदे वागीश्वरी, विधिकन्यके विद्याधरी
१४गगन, सदन तेजोमय 
१५हंस वाहिनी सरस्वती
१६सुखी सर्वांना ठेव देवराया
१७अजाण आम्ही तुझी लेकरे तू सर्वांचा पिता 
१८देवा तुझे किती सुंदर आकाश 


Marathi Prarthana lyrics


खरा तो एकचि धर्म

Marathi Prarthana Khara to Ekachi Dharm Lyrics


​खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे ।।धृ।।

जगी जे दीन अति-पतीत, जगी जे पद-दलीत
तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे ।।१।।

सदा जे आर्त अतिविकल, जयांना गांजति सकल
तया जाऊन हसवावे, जगाला प्रेम अर्पावे ।।२।।

कुणा ना व्यर्थ शिणवावे, कुणा ना व्यर्थ हिनवावे
समस्ता बंधू मानावे, जगाला प्रेम अर्पावे ।।३।।

प्रभूचि लेकरे सारी, तयाला सर्वही प्यारी
कुणा ना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे ।।४।।

असे हे सार धर्माचे, असे हे सार सत्याचे
परार्था प्राण ही द्यावे, जगाला प्रेम अर्पावे ।।५।।
- साने गुरुजी


असो तुला देवा माझा नमस्कार

Marathi Prarthana Aso tula Deva Maza Namskar Lyrics


असो तुला देवा ! माझा सदा नमस्कार
तुझ्या दयादातृत्वाला अंत नाही पार ॥धृ॥

तुझ्या कृपेने रे होतील फुले फत्तराची
तुझ्या कृपेने रे होतील मोती मृत्तिकेची
तुझ्या कृपेने रे होतील सर्प रम्य हार
असो तुला देवा ! माझा सदा नमस्कार ॥१॥

तुझ्या कृपेने होइल उषा त्या निशेची
तुझ्या कृपेने होइल सुधा त्या विषाची
तुझ्या कृपेने होइल पंगु सिंधुपार
असो तुला देवा ! माझा सदा नमस्कार ॥२॥

तुझ्या कृपासिंधूमधला बिंदू जरी मिळेल
तरि प्रभो ! शतजन्मांची मतृषा शमेल
तुझे म्हणुनि आलो राया ! बघत बघत दार
असो तुला देवा ! माझा सदा नमस्कार ॥३॥
— साने गुरुजी

          

देह मंदिर, चित्तमंदिर

Marathi Prarthana Deh Mandir Chittmandir Lyrics


देह मंदिर, चित्तमंदिर, एक तेथे प्रार्थना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना

दु:खितांचे दु:ख जावो ही मनाची कामना
वेदना जाणावयाला जागवू संवेदना
दुर्बलांच्या रक्षणाला पौरूषाची साधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना

जीवनी नवतेज राहो अंतरंगी भावना
सुंदराचा वेध लागो मानवाच्या जीवना
शौर्य लाभो, धैर्य लाभो, सत्यता संशोधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना

भेद सारे मावळू द्या वैर सार्‍या वासना
मानवांच्या एकतेची पूर्ण होवो कल्पना
मुक्‍त आम्ही फक्‍त मानू बंधुतेच्या बंधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना


Marathi Prarthana for school


सर्वात्मका शिवसुंदरा 

Marathi Prarthana Sarvatmaka Shivsundara Lyrics


सर्वात्मका, शिवसुंदरा स्वीकार या अभिवादना
तिमिरातूनी तेजाकडे प्रभू आमुच्या ने जीवना ॥ धृ. ॥

सुमनांत तू, गगनांत तू
तार्‍यांमध्ये फुलतोस तू
सद्धर्म जे जगतामध्ये
सर्वांत त्या वसतोस तू
चोहीकडे रूपे तुझी जाणीव ही माझ्या मना ॥ १ ॥

श्रमतोस तू शेतामध्ये
तू राबसी श्रमिकांसवे
जे रंजले अन गांजले
पुसतोस त्यांची आसवे
स्वार्थावीना सेवा जिथे तेथे तुझे पद पावना ॥ २ ॥

न्यायार्थ जे लढती रणी
तलवार तू त्यांच्या करी
ध्येयार्थ जे तमी चालती
तू दीप त्यांच्या अंतरी
ज्ञानार्थ जे तपती मुनी, होतोस त्या तू साधना ॥ ३ ॥

करुणाकरा, करुणा तुझी
असता मला भय कोठले ?
मार्गावरी पुढती सदा
पाहीन मी तव पाउले
सृजनत्व या हृदयामध्ये नित जागवी भीतीविना ॥ ४ ॥
- कुसुमाग्रज


अनंता तुला कोण पाहू शके ?

Marathi Prarthana Ananta Tula Kon Pahu Shake Lyrics

अनंता तुला कोण पाहू शके ?
तुला गातसा वेद झाले मुके.
मतीमंद अंधा कसा तू दिसे ?
तुझी रूपतृष्णा मनाला असे.


तुझा ठाव कोठे कळेना जरी,
गमे मानसा चातुरी माधुरी.
तरूवल्लरींना भुकी मी पुसे,
"तुम्हा निर्मिता देव कोठे वसे ?"


फुले सृष्टीची मानसा रंजिती,
घरी सोयरी गुंगविती मती,
सुखे भिन्‍न ही, येथ प्राणी चुके
कुठे चिन्मया ऐक्य लाभू शके ?


तुझे विश्व ब्रह्मांड, ही निस्तुला
कृती गावया रे कळेना मला.
भुकी बालका माय देवा चुके,
तया पाजुनी कोण तोषू शके ?


नवी भावपुष्पे तुला वाहिली,
तशी अर्पिली भक्‍तिबाष्पांजली
तुझ्या पद्मपत्रावरी ती स्थिरो
प्रभू ! कल्पना जल्पना त्या हरो.



दिवा पाहुनी लक्ष्मी येते करू तिची प्रार्थना

Marathi Prarthana Diva Pahuni Laxmi Yete Lyrics

दिवा पाहुनी लक्ष्मी येते करू तिची प्रार्थना
शुभंकरोति म्हणा, मुलांनो, शुभंकरोति म्हणा
शुभंकरोति कल्याणम्‌, शुभंकरोति कल्याणम्‌


जेथे ज्योती तेथे लक्ष्मी
उभी जगाच्या सेवाधर्मी
दिशादिशांतुन या लक्ष्मीच्या दिसती पाउलखुणा


या ज्योतीने सरे आपदा
आरोग्यासह मिळे संपदा
शत्रुबुद्धिचा विनाश होता सौख्य मिळे जीवना


दिव्या दिव्या रे दीपत्कार
कानी कुंडल मोतिहार
दिव्यास पाहून नमस्कार हा रिवाज आहे जुना


         Marathi Prarthana song


तू बुद्धि दे

Marathi Prarthana Tu Budhi De Lyrics

तू बुद्धि दे, तू प्रकाश दे, नवचेतना विश्वास दे
जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे


सापडे ना वाट ज्यांना हो तयांचा सारथी
हरवले आभाळ ज्यांचे हो तयांचा सोबती
करिती तुझी जे साधना त्यांना तुझा सहवास दे


सन्मार्ग आणि सन्मती लाभो सदा सत्संगती
नीती ना ही भ्रष्ट हो जरी संकटे आली किती
पंखात ह्या बळ दे नवे झेपावण्या आकाश दे


नमने वाहुनि स्तवने उधळा

Marathi Prarthana Namane Vahuni Stavne Udhala Lyrics

नमने वाहुनि स्तवने उधळा, जयजयकार करा
बंधुहो, जयजयकार करा
सकल मनांचा विकास येतो आज आपुल्या घरा.

विमलहास्यसुमवृष्टीमध्ये असो तुझे स्वागत
निरंतर असो तुझे स्वागत
परमात्म्याच्या चित्सौंदर्या, येई बा हासत.

आत्मवेलिच्या स्फूर्तिफुलांवर वसंत जे विकसती
बुद्धिचे वसंत जे विकसती
त्याच वसंता त्वदीय विकासा, सरस्वती बोलती.

विश्वकाव्य वाचीत बैसली चित्तमयूरावरी
दीप्‍ती जी चित्तमयूरावरी
त्या दीप्‍तीला, त्या ज्ञप्‍तीला, वदती वागीश्वरी.

हे वाग्देवी, असे प्रार्थना ये या संकीर्तना
उत्सवा ये या संकीर्तना
जगन्मंगले, सकल मंगलासह दे पददर्शना.

सगुण शांत त्वच्‍चित्रमूर्तिला गातो मी गायन
शारदे गातो मी गायन
धन्य धन्य सौंदर्य, धन्य त्वत्प्रसन्‍नपुण्यानन.

किरिट शोभला त्वन्मौलीला अमूल्य तत्वांचा
शारदे अमूल्य तत्वांचा
अरुणराग त्यातून उधळला सद्गुणरत्‍नांचा.

डोले कंठी सच्छास्‍त्रांचा चंद्रहार हासरा
पाहुनी चंद्रहार हासरा
भाली फुलला, गाली खुलला काव्यदिव्यबिजवरा.

सौंदर्याहुनि दिव्य दिव्यतर हिचे ज्ञान सुंदर
खरोखर हिचे ज्ञान सुंदर
त्या ज्ञानाहुनी जगात सुंदर एकच परमेश्वर.

हृदयमंदिरी प्राणशक्‍तीचे झोपाळे डोलवी
देवि ही झोपाळे डोलवी
सुखदु:खांचे देउनि झोके जिवांना खेळवी.

विचारकारंज्यावर तुषार शब्दांचे नाचवी
देवि ही शब्दांचे नाचवी
जिवात्मा त्यातून बोलवी परमात्मा डोलवी.

चराचरांचा दावि चित्रपट अमुच्या स्मरणावर
भराभर अमुच्या स्मरणावर
विजेऐवजी त्यात जळे चित्‍चंद्राचे झुंबर.


मार्ग लाभो पावलांना ही तृणाची याचना

Marathi Prarthana Marg Labho Pavalana Hi Trunachi Yachana Lyrics

मार्ग लाभो पावलांना ही तृणाची याचना
लाभु दे ऐसा वसा की जन्‍म होवो प्रार्थना

जन्मती जन्मासवें काही रूढींची बंधने
दोर नियमांचे जखडती हे मनाचे चांदणे
संपु दे त्याच्या व्रताने ही युगाची वंचना

जाणत्यांचा धर्म असतो माणसाला जाणणे
आपल्या आतील दु:खे स्वेतरांतून वाचणे
सार सार्‍या धर्मपंथांचे असे सहवेदना

काय जे जमिनीवरी आहेत ते मातीतले ?
का तयांना वर्ज्‍य हे आनंद या वार्‍यातले
लाभु दे अवकाश त्यांसी ही मनाला सांत्‍वना


हे करुणाकरा, ईश्वरा

Marathi Prarthana He Karuakara Ishwara Lyrics

हे करुणाकरा, ईश्वरा । कृपादान मज देई
तुजविण कोण निवारी संकट । दृढता ही तव पायी ॥

तूही आदि तू अनंत । तूही दु:स्तर भवनिधि तारक
तानसेन प्रभु तुम्ही उद्धरा ॥



Marathi Prarthana written


तू अनश्वरातील अमरेश्वर अविनाशी

Marathi Prarthana Tu Anshwaratil Amareshwar Avinashi Lyrics

तू अनश्वरातील अमरेश्वर अविनाशी
मज देशील का तू दर्शन दिव्य प्रकाशी

तू चिरंतनातील ईश्वर असशिल का रे
हे दोन घडीचे वैभव नश्वर सारे
बरसती तुझ्यावर नक्षत्रांच्या राशी

गाईली किती मी तव करुणामय गाणी
दाटला गळा मग नयनी उरले पाणी
तू मंगल प्रतिभा ब्रह्म:तेज आकाशी

का तुला न यावी करुणा माझी देवा
तू केवळ माझ्या सर्वस्वाचा ठेवा
दे मला आसरा तुझिया चरणापाशी


शुद्धी दे, बुद्धी दे, हे दयाघना

Marathi Prarthana Shudhi De Budhi De Lyrics


शुद्धी दे, बुद्धी दे, हे दयाघना
शक्‍ती दे, मुक्‍ती दे आमुच्या मना

तरतम ते उमजेना, उमजेना सत्य
फसविते आम्हांला विश्व हे अनित्य
दिग्दर्शन मज व्हावे हीच कामना

स्वत्वाला विसरून जर भ्रमले हे चित्त
ऋजुतेवर मात करी द्रोह हा प्रमत्त
निर्भयता जागावी हीच प्रार्थना


जय शारदे वागीश्वरी

Marathi Prarthana Jay Sharde Wagishwari Lyrics

जय शारदे वागीश्वरी, विधिकन्यके विद्याधरी

ज्योत्‍स्‍नेपरी कांती तुझी, मुख रम्य शारद चंद्रमा
उजळे तुझ्या हास्यांतुनी चारी युगांची पौर्णिमा
तुझिया कृपेचे चांदणे नित्‌ वर्षु दे अमुच्या शिरी

वीणेवरी फिरता तुझी चतुरा कलामय अंगुली
संगीत जन्मा ये नवे, जडता मतिची भंगली
उन्मेष कल्पतरूवरी बहरून आल्या मंजिरी


गगन, सदन तेजोमय

Marathi Prarthana Gagan Sadan Tejomay Lyrics

गगन, सदन तेजोमय
तिमिर हरून करुणाकर
दे प्रकाश, देई अभय

छाया तव, माया तव
हेच परम पुण्यधाम
वार्‍यातून, तार्‍यांतुन
वाचले तुझेच नाम
जग, जीवन, जनन, मरण
हे तुझेच रूप सदय

वासंतिक कुसुमांतून
तूच मधुर हासतोस
मेघांच्या धारांतुन
प्रेमरूप भासतोस
कधि येशील चपलचरण
वाहिले तुलाच हृदय

भवमोचन हे लोचन
तुजसाठी दोन दिवे
कंठातील स्वर मंजुळ
भावमधुर गीत नवे
सकल-शरण, मनमोहन
सृजन तूच, तूच विलय


Marathi Prarthana poem


 हंस वाहिनी सरस्वती

Marathi Prarthana Hans Vahini Saraswati Lyrics

हंस वाहिनी सरस्वतीच्या,
पदकमली रमते,
माझे मन पावन होते ।।धृ.।।

वीणा हाती मंजूळ वादन
श्वेत कमल के मंगल आसन
राजहंस तव राजस वाहन
घे वंदन माते ||२||

मूर्ती साजरी नयन मनोहर
धवल वस्त्र किती शोभे सुंदर
चंद्रही भासे उदात्त अंबर
भारावून जाते ||१||


  सुखी सर्वांना ठेव देवराया

Marathi Prarthana Sukhi Sarvana Thev Devraya Lyrics


सुखी सर्वांना ठेव देवराया ।
मागणे हे आमुचे तुझे पाया ।
ठेव आई वडिलांस तू खुशाल ।
तरी मागू जेते आम्हा मिळेल ||१||

नसो गुणाच्या इडा-पिडा पाठी ।
घरी नांदो संपदा प्रहर आठी ।
दिवा-बत्तीला कधी न पडो खंड ।
आयुष्य लाभो घरधन्याला उदंड ||२||

देवा मला ज्ञान दे विवेक देव शक्ती दे यश दे


  अजाण आम्ही तुझी लेकरे तू सर्वांचा पिता

Marathi Prarthana Ajan aamhi Tuzi lekare Lyrics

अजाण आम्ही तुझी लेकरे तू सर्वांचा पिता
नेमाने तुज नमितो, गातो तुझ्या गुणांच्या कथा

सूर्यचंद्र हे तुझेच देवा, तुझी गुरेंवासरें
तुझीच शेते, सागर, डोंगर, फुले, फळे, पाखरे

अनेक नावे तुला तुझे रे दाही दिशांना घर
करिशी देवा सारखीच तू माया सगळ्यांवर

खूप शिकावे, काम करावे, प्रेम धरावे मनी
हौस एवढी पुरवी देवा हीच एक मागणी


Marathi Prarthana pdf


  देवा तुझे किती सुंदर आकाश

Marathi Prarthana Deva Tuze Kiti Sundar Aakash Lyrics


देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो

सुंदर चांदण्या चंद्र हा सुंदर
चांदणे सुंदर पदे त्याचे

सुंदर ही झाडे, सुंदर पाखरे
किती गोड बरे गाणे गाती

सुंदर वेलींची सुंदर ही फुले
तशी आम्ही मुले देवा तुझी

इतुके सुंदर जग तुझे जर
किती तू सुंदर असशील


          तुम्हाला मराठी प्रार्थना | Prayer in Marathi | Prarthana in Marathi | Marathi Prarthana ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा. 

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad